BLOGS-IN-BLOG
HERE YOU CAN FIND ALL THE BLOGS YOU WANT
Qries
Home » » श्रीगुरूचरित्र अध्‍याय १ ला

श्रीगुरूचरित्र अध्‍याय १ ला

श्रीगणेशाय नम:श्रीसरस्‍वत्‍यै नम: श्रीगुरूभ्‍यो नम: श्रीकुलदेवतायै नम: श्रीपादवल्‍लभाय नम:। श्रीनृसिंहसरस्‍वत्‍यै नम:। ॐ नमोजी विघ्‍नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥१॥ हालविशी कर्णयुगुले । तेथूनि जो कां वारा उसळे । त्‍याचेनि वातें विघ्‍न पळें । विघ्‍नांतक म्‍हणती तुज ॥२॥ तुझे शोभे आनन । जैसें तप्‍त कांचन । किंवा उदित प्रभारण । तैसें तेज फाकतसे ॥३॥ विघ्‍नकाननछेदनासी । हाती फरस धरिलासी। नागबंध कटीसी । उरग यज्ञोपवीत ॥४॥
चतुर्भुज दिससी निका । विशालाक्षा विनायका । प्रतिपाळिसी विश्‍वलोकां निर्विघ्‍नें करोनियां ॥५॥ तुझें चिंतन जे करिती । तयां विघ्‍ने न बाधतीं । सकळाभीष्‍टे साधतीं । अविलंबेसी ॥६॥ सकळ मंगळ कार्यासी । प्रथम वंदिजे तुम्‍हासी । चतुर्दश विद्यांसी । स्‍वामी तूंचि लंबोदरा ॥७॥ वेदशास्‍त्रें पुराणें तुझेंची असेल बोलणें । ब्रह्मादिकीं याकारणें । स्‍तविला असे सुरवरीं ॥८॥ त्रिपुर साधन करावयासी । ईश्‍वरें अर्चिलें तुम्‍हासी । संहारावया दैत्‍यांसी । पहिलें तुम्‍हासी स्‍तविलें ॥९॥ हरिहरब्रह्मादिक गणपती । कार्यारंभी तुज वंदिती । सकळाभीष्‍टें साधती । तुझेनि प्रसादें ॥१०॥ कृपानिधी गणनाथा । सुरवरांदिकां विघ्‍नहर्ता । विनायका अभयदाता । मतिप्रकाश करी मज ॥११॥ समस्‍त गणांचा नायक । तूंचि विघ्‍नांचा अंतक । तुतें वंदिती जे लोक । कार्य साधें तयांचें ॥१२॥ सकळ कार्या आधारू । तूंचि कृपेचा सागरू । करूणानिधी गौरीकुमरू । मतिप्रकाश करीं मज ॥१३॥ माझे मनींची वासना । तुवां पुरवावी गजानना । साष्‍टांग करितों नमना । विद्या देई मज आतां ॥१४॥ नेणता होतों मतिहीन । म्‍हणोनि धरिले तुझे चरण । चवदा विद्यांचें निधान । शरणागतवरप्रदा ॥१५॥ माझिया अंत:करणीचे व्‍हावें । गुरूचरित्र कथन करावें । पूर्ण दृष्‍टीनें पहावें । ग्रंथ सिद्धी पाववी दातारा ॥१६॥ आतां वंदूं ब्र‍ह्मकुमरी । जिचें नाम वागीश्‍वरी । पुस्‍ककवीणा जिचे करीं । हंसवाहिनी असे देखा ॥१७॥ म्‍हणोनि नमितों तुझे चरणी । प्रसन्‍न व्‍हावें मज स्‍वामिणी । राहोनियां माझिये वाणीं । ग्रंथी रिघू करीं आतां ॥१८॥ विद्यावेदशास्‍त्रांसीं । अधिकार जाणा शारदेशी । तिये वंदितां विश्‍वासी । ज्ञान होय अवधारा ॥१९॥ ऐक माझी विनंती । द्यावी आतां अवलीला मती । विस्‍तार करावया गुरूचरित्रीं । मतिप्रकाश करीं मज ॥२०॥ जय जय जगन्‍माते तूंचि विश्‍वीं वाग्‍देवते । वेदशास्‍त्रें तुझी लिखितें । नांदविशी येणे परी ॥२१॥ माते तुझिया वाग्‍वाणी । उत्‍पति वेदशास्‍त्रपुराणीं । वदतां साही दर्शनीं । त्‍यातें अशक्‍य परियेसा ॥२२॥ गुरूचे नामीं तुझी स्थिती । म्‍हणती नृसिंहसरस्‍वती । याकारणें मजवरी प्रीती । नाम आपुले म्‍हणूनी ॥२३॥ खांबसूत्राचीं बाहुलीं जैसीं। खेळतीं तया सूत्रासरसीं । स्‍वतंत्रबुद्धी नाहीं त्‍यांसी । वर्तती आणिकाचेनि मते॥२४॥ तैसें तुझेनि अनुमतें । माझे जिव्‍हे प्रेरीं माते । कृपानिधी वाग्‍देवते । म्‍हणोनि विनवी तुझा बाळ ॥२५॥ म्‍हणोनि नमिले तुझे चरण । व्‍हावें स्‍वामिणी प्रसन्‍न । द्यावें माते वरदान । ग्रंथी रिघू करवीं आतां ॥२६॥ आतां वंदूं त्रिमूर्तीसी । ब्र‍ह्माविष्‍णुशिवासी । विद्या मागें मी तयांसी । अनुक्रमें करोनी॥२७॥ चतुर्मुखें असती ज्‍यासी । कर्ता जो का सृष्‍टीसी । वेद झाले बोलते ज्‍यासी । त्‍याचे चरणी नमन माझें ॥२८॥ आतां वंदूं ह्रषीकेशी । जो नायक या विश्‍वाशी । लक्ष्‍मीसहित अहर्निशी । क्षीरसागरीं असे जाणा॥२९॥ चतुर्बाहू नरहरी । शंख चक्र गदा करी । पद्महस्‍त मुरारी । पद्मनाभ परियेसा॥३०॥ पीतांबर असे कशियेला । वैजयंती माळा गळां । शरणागतां अभीष्‍ट सकळा । देता होय कृपाळू ॥३१॥ नमन समस्‍त सुरवरा । सिद्धसाध्‍या अवधारा । गंधर्वयक्षकिन्‍नरां । ऋषीश्‍वरां नमन माझें ॥३२॥ वंदूं आतां कविकुळासी । पराशरादि व्‍यासासी । वाल्‍मीकादि सकळिकांसी । नमन माझें परियेसा ॥३३॥ नेणें कवित्‍व असे कैसें । म्‍हणोनि तुम्‍हा विनवितसें । ज्ञान द्यावें जी भरवसें । आपुला दास म्‍हणोनी॥३४॥ न कळे ग्रंथप्रकार । नेणे शास्‍त्रांचा विचार । भाषा नये महाराष्‍ट्र । म्‍हणोनी विनवीं तुम्‍हासीं॥३५॥ समस्‍त तुम्‍ही कृपा करणें । माझिया वचना साह्य होणें । शब्‍दव्‍युत्‍पत्ति नेणें । कविकुळ तुम्‍ही प्रतिपाळा ॥३६॥ ऐसें सकळिकां विनवोनी । मग ध्‍याइले पूर्वज मनीं । उभयपक्ष जनकजननी । माहात्‍म्‍य पुण्‍यपुरूषांचें ॥३७॥ आपस्‍तंबशाखेसी। गोत्र कौंडिण्‍य महाऋषी। साखरे नाम ख्‍यातीसी। सायंदेवापासाव॥३८॥ त्‍यावासूनी नागनाथ। देवराव तयाचा सुत । सदा श्रीसद् गुरूचरण ध्‍यात । गंगाधर जनक माझा॥३९॥ नमन करितों जनकचरणीं मातापूर्वज ध्‍यातों मनीं। जो कां पूर्वज नामधारणीं। अश्‍वलायन शाखेचा॥४०॥ काश्‍यपाचे गोत्रीं । चौडेश्‍वर नामधारी । वागे जैसा जन्‍हु अवधारीं । अथवा जनक गंगेचा॥४१॥ त्‍याची कन्‍या माझी जननी। निश्‍चयें जैशी भवानी। चंपा नामें पुण्‍यखाणी। स्‍वामिणी माझी परियेसा ॥४२॥ नमितां जनकजननींसी। नंतर नमूं श्रीगुरूसी। झाली मति प्रकाशी। गुरूचरण स्‍मरावया ॥४३॥ गंगाधराचे कुशीं। जन्‍म झाला परियेसीं। सदा ध्‍याय श्रीगुरूसी। एका भावें निरंतर ॥४४॥ म्‍हणोनि सरस्‍वतीगंगाधर। करी संतांसीं नमस्‍कार। श्रोतयां विनवी वारंवार। क्षमा करणें बाळकासी॥४५॥ वेदाभ्‍यासी संन्‍यासी। यती योगेश्‍वर तापसी। सदा ध्‍याती श्रीगुरूसी। तयांसी माझा नमस्‍कार॥४६॥ विनवितसें समस्‍तांसी। अल्‍पमती आपणासी। माझे बोबडे बोलासी। सकळ तुम्‍ही अंगिकारा॥४७॥ तावन्‍मात्र माझी मती। नेणें काव्‍य व्‍युत्‍पत्ति। जैसे श्रीगुरू निरोपिती। तेणें परी सांगत॥४८॥ पूर्वापार आमुचे वंशीं। गुरू प्रसन्‍न अहर्निशीं। निरोप देती मातें परियेसीं। चरित्र आपुलें विस्‍तारावया॥४९॥ म्‍हणे ग्रंथ कथन करी। अमृतघट स्‍वीकारीं। तुझे वंशी परंपरी। लाधती चारी पुरूषार्थ॥५०॥ गुरूवाक्‍य मज कामधेनू। मनीं नाहीं अनुमानु। सिद्धि पावविणार आपणू। नृसिंहसरस्‍वती॥५१॥ त्रैमूर्तीचा अवतार। झाला नृसिंह सरस्‍वती नर। कवण जाणे याचा पार। चरित्र कवणा वर्णवें॥५२॥ चरित्र ऐसें श्रीगुरूचें। वर्णूं न शकें मी वाचें। आज्ञापन असे श्रीगुरूचें। म्‍हणोनि वाचें बोलतसें॥५३॥ ज्‍यास पुत्रपौत्रीं असे चाड। त्‍यासी कथा हे असे गोड। लक्ष्‍मी वसे अखंड। तया भुवनीं परियेसा॥५४॥ ऐशी कथा जयाचे घरीं। वाचिती नित्‍य प्रेमभरीं। श्रिया युक्‍त निरंतरी। नांदती पुत्रकलत्रेसी॥५५॥ रोग नाहीं तया भुवनीं। सदा संतुष्‍ट गुरूकृपेंकरोनि। नि:संदेह सातां दिनीं। ऐकता बंधन तुटें जाणा॥५६॥ ऐसी पुण्‍यपावन कथा। सांगेन ऐक विस्‍तारता। सायरसाविण होय साध्‍यता। सद्य: फल प्राप्‍त होय॥५७॥ निधान लाधें अप्रयासीं। तरी कष्‍ट कासयासी। विश्‍वासूनि माझिया बोलासीं। ऐका श्रोते एकचित्तें॥५८॥ आम्‍हा साक्षी ऐसें घडलें। म्‍हणोनि विनवितसें बळें। श्रीगुरू स्‍मरण असे भलें। अनुभवा हो सकळिक॥५९॥ तृप्ति झालियावरी ढेंकर। देती जैसे जेवणार। गुरू महिमेचा उदगार। बोलतसें अनुभवोनीं॥६०॥ मी सामान्‍य म्‍हणोनी। उदास व्‍हाल माझे वचनीं। मक्षिकेच्‍या मुखांतूनी। मधु केवी ग्राह्य होय ॥६१॥ जैसे शिंपल्‍यात मुक्‍ताफळ। अथवा कर्पूर कर्दळ। विचारीं पां अश्‍वस्‍थमूळ। कवणापासव उत्‍पत्ती ॥६२॥ ग्रंथ कराल उदास। वांकुडा कृष्‍ण दिसे ऊंस। अमृत निघे त्‍याचा रस। दृष्टि द्यावी तयावरी ॥६३॥ तैसें माझें बोलणें। ज्‍यासी चाड गुरूकारणें। अंगिकार करणार शहाणे। अनुभविती एकचित्तें ॥६४॥ ब्रह्म रसाची गोडी। अनुभवितां फळें रोकडीं। या बोलाची आवडी। ज्‍यासी संभवे अनुभव ॥६५॥ गुरूचरित्र कामधेनू। ऐकतां होय महाज्ञानू। श्रोतीं करोनियां सावध मनू। एकचित्ते परियेसा ॥६६॥ श्रीगुरू नृसिंहसरस्‍वती। होते गाणगापुरीं ख्‍याती। महिमा त्‍यांचा अत्‍यद्-भुती। सांगेन ऐका एकचित्ते ॥६७॥ तया ग्रामीं वसती गुरू। म्‍हणोनि महिमा असे थोरू। जाणती लोक चहूं राष्‍ट्रू। समस्‍त जाती यात्रेसी ॥६८॥ तेथें राहोनि आराधिती। त्‍वरित होय फलप्रात्‍ती। पुत्रदाता धन संपत्ती। जें जें इच्छिलें होय जनां ॥६९॥ लाधोनियां संतान। नाम ठेविती नामकरण। संतोषरूपें येऊन। पावतीं चारी पुरूषार्थ ॥७०॥ ऐसें असतां वर्तमानीं। भक्‍त एक नामकरणी। कष्‍टतसे अतिगहनीं। सदा ध्‍याय श्रीगुरूसी ॥७१॥ ऐसा मनीं व्‍याकुळित। चिंतेनें वेष्टिला बहुत। गुरूदर्शना जाऊं म्‍हणत। निर्वाण मानसें निवाला ॥७२॥ अति निर्वाण अंत:करणीं। लय ला‍वोनि गुरूचरणीं। जातो शिष्‍यशिरोमणी। विसरोनिया क्षुधा तृष्‍णा ॥७३॥ निर्धार करोनि मानसीं। म्‍हणे पाहीन श्रीगुरूसी। अथवा सांडीन देहासी। जडस्‍वरूपें काय काज ॥७४॥ ज्‍याचें नामस्‍मरण करितां। दैन्‍यहानि होय त्‍वरिता। आपण तैसा नामांकिता। किंकर म्‍हणतसे ॥७५॥ दैव असे आपुलें उण। तरी कां भजावे गुरूचरण। परिस लागतां लोहा जाण। सुवर्ण केवीं होतसे ॥७६॥ तैसें तुझे नामपरिसें। माझे हृदयी सदा वसें। मातें कष्‍टी सायासें। ठेवितां लाज कवणासी ॥७७॥ या बोलाचिया हेवा । मनीं धरोनि पहावा । गुरूमूर्तींसी दाखवा । कृपाळुवा सर्व भूती ॥७८॥ अतिव्‍याकुळ अंत:करणीं । निंदा स्‍तुति आपुले वाणीं । करितां भक्‍त नामकरणी । कष्‍टाला होय परियेसा ॥७९॥ राग स्‍वेच्‍छा ओवीबद्ध म्‍हणावे । आजि पाहुणे पंढरीचे रावे । वंदूं विघ्‍नहरा भावें । नमूं ते सुंदरा शारदेसी ॥८०॥ गुरूचि त्रैमूर्ती । म्‍हणती वेद श्रुती । सांगती दृष्‍टांती । कलियुगांत ॥८१॥ कलियुगांत ख्‍याती । नृसिंहसरस्‍वती । भक्‍तांसी सारथी । कृपासिंधू ॥८२॥ कृपासिंधू भक्‍ता । वेद वाखाणिता । त्रयमूर्ति गुरूनाथा । म्‍हणोनिया ॥८३॥ त्रयमूर्तींचे गुण तूं एक निधान । भक्‍तांसी रक्षण । दयानिधी । दयानिधी यती । विनवितों मी श्रीपति । नेणें भावभक्‍ती । अंत:करणीं ॥८५॥ अंत:करणीं स्थिरू । नव्‍हे बा श्रीगुरू । तूं कृपासागरू। पाव वेगीं ॥८६॥ पाव वेगीं आतां । नरहरी अनंता । बाळालागीं माता । केवीं टाकी ॥८७॥ तूं माता तूं पिता । तूंचि सखा भ्राता । तूंचि कुळदेवता । परंपरीं ॥८८॥ वंशपरंपरी । धरूनि निर्धारी । भजतों मी नरहरी । सरस्‍वती ॥८९॥ सरस्‍वतीनरहरी । दैन्‍य माझे हरी । म्‍हणूनि मी निरंतरीं । सदा कष्‍टें ॥९०॥ सदा कष्‍ट चित्ता । कांहो देशी आतां । कृपासिंधु भक्‍ता । केवीं होसी ॥९१॥ कृपा सिंधु भक्‍ता । कृपाळु अनंता । त्रयमूर्ती जगन्‍नाथा । दयानिधी ॥९२॥ त्रयमूर्तीं तूं होसी। पाळिसी विश्‍वासी । समस्‍त देवांसी । तूचिं दाता ॥९३॥ समस्‍तां देवांसी । तूंचि दाता होसी । मागों मी कवणासी । तुजवांचोनी ॥९४॥ तुजवांचोनि आतां । असे कवण दाता । विश्‍वासी पोषिता । सर्वज्ञ तूं ॥९५॥ सर्वज्ञाची खूण । असे हें लक्षण । समस्‍तांतें जाणें । कवण ऐसा ॥९६॥ सर्वज्ञ म्‍हणोनी । वानिती पुराणीं । माझे अंत:करणीं । न ये साक्षी ॥९७॥ कवण कैशापरी । असती भूमीवरी । जाणिजेचि तरी । सर्वज्ञ तो ॥९८॥ बाळक तान्‍हयें । नेणें बापमायें । कृपा केवीं होय । मातापित्‍या ॥९९॥ दिलियावांचोनी । न देववे म्‍हणोनी । असेल तुझे मनीं । सांग मज ॥१००॥ समस्‍त महीतळी । तुम्‍हा दिल्‍ही बळी । त्‍यातें हो पाताही बैसविलें ॥१॥ सुवर्णाची लंका । तुवां दिल्‍ही एका । तेणें पूर्वीं लंका । कवणा दिल्‍ही ॥२॥ अढळ ध्रुवासी । दिल्‍हे ह्रषीकेशी । त्‍याणें हो तुम्‍हासी । काय दिल्‍हें ॥३॥ नि:क्षस्‍त्र करूनी। व्रिपानें मेदिनीं। देतां तुम्‍हा कोणीं। काय दिल्‍हें ॥४॥ सृष्‍टीचा पोषक। तूंचि देव एक। तूंते मी मशक। काय देऊ ॥५॥ नाहीं तुम्‍हापरी। श्रीमंत नरहरी। लक्ष्‍मी तुझे घरीं। नांदतसे ॥६॥ याहूनि आम्‍हांसी। तूं काय मागसी। सांग ह्रषीकेशी। काय देऊं ॥७॥ मातेचे वोसंगी। बैसे बाळ वेगीं। पसरी मुखसुरंगी। स्‍तनकांक्षेसीं ॥८॥ बाळापासीं माता। काय मागें ताता। ऐक श्रीगुरूनाथा। काय देऊं ॥९॥ घेऊनिया देतां। नाम नाहीं दाता। दयानिधी म्‍हणतां। बोल दिसे ॥१०॥ देऊं न शकसी। म्‍हणे मी मानसीं। चौदाही भुवनांसी। तूंचि दाता ॥११॥ तुझें मनीं पाही। वसे आणिक कांहीं। सेवा केली नाहीं। म्‍हणोनिया ॥१२॥ सेवा घेवोनिया। देणें हें सामान्‍य। नाम नसे जाण। दातृत्‍वासी ॥१३॥ तळीं बावी विहिरी। असती भूमीवरी। मेघ तो अंबरीं। वर्षतसे ॥१४॥ मेघाची ही सेवा। न करीता स्‍वभावा। उदक पूर्ण सर्वां। केवीं करी ॥१५॥ सेवा अपेक्षितां। बोल असे दाता। दयानिधी म्‍हणतां। केवीं साजे ॥१६॥ नेणें सेवा कैसी। स्थिर होय मानसीं। माझे वंशोवंशीं। तुझे दास ॥१७॥ माझे पूर्वजवंशी। सेविलें तुम्‍हांसी। संग्रह बहुवसी। तुझे चरणीं ॥१८॥ बापाचे सेवेसी। पाळिती पुत्रासी। तेवीं त्‍वां आम्‍हासी। प्रतिपाळावें ॥१९॥ माझें पूर्वधन। तुम्‍हीं द्यावें ऋण। कां बा नये करूणा। कृपासिंधू ॥२०॥ आमुचें आम्‍ही घेतां। कां बा नये चित्ता। मागेन मी सत्ता। घेईन आतां ॥२१॥ आतां मज जरी। न देसी नरचरी। जिंतोनि वेव्‍हारी। घेईन जाणा ॥२२॥ दिसतसे आतां। क‍ठिणता गुरूनाथा। दास मी अं‍किता। सनातन ॥२३॥ आपुलेसमान। असेल कवण। तयासवें मन। कठिण कीजे ॥२४॥ कठिण कीजे हरी। तुवां दैत्‍यांवरी। प्रल्‍हाद कैवारी। सेवकांसी ॥२५॥ सेवकाबाळकांसी। करूं नये ऐसी। कठिणता परियेसी। बरवें न दिसे ॥२६॥ माझिया अपराधीं। धरोनिया बुद्धी। अंत:करण क्रोधी। पहासी जरी ॥२७॥ बाळक मातेसी। बोले निष्‍ठुरेसीं। अज्ञानें मायेसी। मारी जरी ॥२८॥ माता त्‍या कुमरासी। कोप न धरी कैसी। आलिंगोनि हर्षी। संबोखी पां ॥२९॥ कवण्‍या अपराधेसी। घालिसी आम्‍हासी। अहो ह्रषीकेशी। सांगा मज ॥३०॥ माता हो कोपेसीं। बोले बाळकासी। जावोनि पितयासी। सांगे बाळ ॥३१॥ माता कोपे जरी। एकादे अवसरीं। पिता कृपा करी। संबोखूनी ॥३२॥ तूं माता तूं पिता। कोपसी गुरूनाथा। सांगो कवणा आतां। क्षमा करीं ॥३३॥ तूंचि स्‍वामी ऐसा। झाला जगीं ठसा। दास तुझा भलतसा। प्रतिपाळावा ॥३४॥ अनाथरक्षक। म्‍हणती तुज लोक। मी तुझा बालक। प्रतिपाळावें ॥३५॥ कृपाळू म्‍हणोनि। वानिती पुराणीं। माझे बोल कानीं। न घालिसीच ॥३६॥ नायकसी गुरूराणा। माझे करूणावचना। काय दु‍श्चितपणा। तुझा असे ॥३७॥ माझें करूणावचन। न ऐकती तुझे कान। ऐकोनि पाषाण। विखुरतसे ॥३८॥ करूणा करीं ऐसें। वानिती तुज पिसें। अझूनि तरी कैसें। कृपा नये ॥३९॥ ऐसें नामांकित। विनविता त्‍वरित। कृपाळू श्रीगुरूनाथ। आले वेगी ॥४०॥ वत्‍सालागीं धेनू। जैसी ये धांवोनू। तैसे श्रीगुरू आपणू। आले जवळी ॥४१॥ येतांचि गुरूमुनी। वंदी नामकरणी। मस्‍तक ठेवोनी। चरणयुग्‍मीं ॥४२॥ केश तो मोकळी। झाडी चरणधुळी। आनंदाश्रुजळीं। अघ्रिक्षाळी ॥४३॥ हृदयमंदिरांत। बैसवोनि व्‍यक्‍त। पूजा उपचारित। षोडशविधी ॥४४॥ आनंदभरित। झाला नामांकित। हृदयीं श्रीगुरूनाथ। स्थिरावला ॥४५॥ भक्‍तांच्‍या हृदयांत। राहे श्रीगुरूनाथ। संतोष बहुत। सरस्‍वतीसी ॥४६॥ इति श्रीगुरूचरित्र परम कथा कल्‍पतरौ श्रीनृसिंहसरस्‍वत्‍युपाख्‍याने सिद्धनामधारकसंवादे प्रथमोऽध्‍याय:।।1।। ।। ओंवी संख्‍या ॥१४६॥

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

comedy scene

Visitors Today
free hit counter
Featured Post
Flag Counter

Blog Archive

Tips Tricks And Tutorials
Disclaimer : All My Postings in this whole Site is not my own collection. All were founded and downloaded from internet and posted by some one else. So none of these are my own videos and pictures and stories. I am not want to violating any copy rights law or any illegal activity.